Ad will apear here
Next
विहीर : जाणीव-नेणिवेतल्या संवेदनांचा संपृक्त अर्क

उमेश कुलकर्णी यांचं अतिशय प्रभावी असं दिग्दर्शन, गिरीश कुलकर्णी, सती भावे यांची पटकथा, गिरीश कुलकर्णी यांनी लिहिलेले उत्कृष्ट संवाद, सर्वच कलाकारांचा दर्जेदार अभिनय, सुधीर पलसानेंचं देखणं छायाचित्रण आणि मंगेश धाकडे यांचं अर्थपूर्ण संगीत अशा सर्व घटकांमुळे आणि अत्यंत अर्थपूर्ण अशा आशयामुळे, ‘विहीर’ हा एक महत्त्वपूर्ण मराठी चित्रपट म्हणून गणला जातो... ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या ‘विहीर’ या उमेश कुलकर्णी दिग्दर्शित मराठी चित्रपटाबद्दल... 
......................
आयुष्याचा एकूण पैस, त्यामध्ये सामावणाऱ्या घटना, त्या घटनांमागचं तत्त्वज्ञान, त्या तत्त्वज्ञानाभोवती असलेलं गूढ वलय, या सगळ्यांशी जोडली गेलेली विविध पात्रं, त्यांचे स्वभावधर्म, त्यातून आकारास आलेलं सुख अथवा दु:ख, या सगळ्याचा अदमास घेत, आपल्या खास शैलीतून, विविध साहित्यकृती साकारत, दि. बा. मोकाशी, जी. ए. कुलकर्णी आणि चिं. त्र्यं. खानोलकर यांनी मराठी साहित्यविश्वाला मौल्यवान रत्ने अर्पण केली. आपला अगदी वेगळा, अमीट असा ठसा उमटवला आणि तमाम रसिक वाचकांना उपकृत केले. प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची ‘विहीर’ ही कलाकृती त्यांनी दि. बा., जी. ए. आणि चिं. त्र्यं. यांना अर्पण केली आहे. मराठी साहित्यविश्वातली अत्यंत महत्त्वाची अशी तीन नावं, जेव्हा एखाद्या कलाकृतीशी या ना त्या प्रकारे जोडली जातात, तेव्हा त्या कलाकृतीबाबतची उत्सुकता वाढीस लागते. 

एका लग्नाच्या निमित्ताने, पुण्याजवळच्या एका खेडेगावातल्या घरात, नातेवाईक मंडळी एकत्र जमलेली असतात. एरव्ही शांत असणाऱ्या कौलारू घराला गोकुळाचं स्वरूप आलेलं असतं. पाहुणे-रावळे, मित्रमंडळी जमलेली असतात. गप्पाटप्पा आणि मौजेला बहर आलेला असतो. सुरुवातीच्या प्रसंगात, लहान मुले लपाछपीच्या खेळात गर्क असतात. या साध्या सरळ खेळात कुमार वयातला नचिकेत एक वेगळा अर्थ शोधू पाहत असतो. त्याच्या मनात अगणित प्रश्नांची निर्मिती होत असते. त्याचं स्वतःचं असं एक तत्त्वज्ञान हळूहळू आकार घेत असतं. नुकतीच त्याची दहावीची परीक्षा संपलेली असते. इतर सर्वसामान्य मुलांसारखा, ‘आर्ट्स, कॉमर्स की सायन्स’हा प्रश्न त्याला भेडसावत नसतो. कारण, याबद्दलचं आणि एकंदरीतच आयुष्याबद्दलचं उत्तर त्यानं स्वतःच शोधलेलं असतं. 

‘आयुष्याच्या पळसाला पाने तीनच - आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स’, हा नचिकेतचं मनोगत म्हणून येणारा संवाद, त्याचं वेगळेपण सुरुवातीच्या काही मिनिटांतच अधोरेखित करतो. समीर, या पुण्याला राहणाऱ्या आपल्या लहान मावसभावाला नचिकेत पत्र लिहून सांगतो, की विश्वात ओसंडत्या असणाऱ्या अक्षय्य ऊर्जेचं केंद्र त्याला शोधायचं आहे. ऊर्जेच्या रूपांतरणाचा क्षण अनुभवायचा आहे. परमोच्च गती असताना स्थिरता अनुभवायची आहे. दहावी संपायच्या, सर्वसाधारणरीत्या लहान मानल्या जाणाऱ्या त्याच्या वयातली त्याची विचारक्षमता, त्याचं इतरांपेक्षा अत्यंत वेगळं असणारं असं आकलन, त्यातून आकार घेणारं तत्त्वज्ञान, त्याची परिपक्वता खूप वेगळी भासते. लग्नानिमित्त गावी एकत्र जमण्याआधी, एकमेकांना लिहिलेल्या पत्रांमधून नचिकेत आणि समीरचे स्वभाव उलगडू लागतात. समीर एक सर्वसाधारण मुलगा असतो. अकाली प्रौढत्व आल्यासारखं बोलणारा गंभीर, पण हसतमुख नचिकेत, हा समीरसाठी एक आदर्श आणि लाडका असा दादा असतो. चारचौघांसारखा. गावाकडे असणाऱ्या आपल्या दादावर जीव जडवून असलेला. वयानुरूप मिश्कील आणि खेळकर स्वभाव असलेला. नचिकेतदादा गंभीर, पटकन न कळणारं असं तत्त्वज्ञान सांगतो, तेव्हा ते भारावून जाऊन ऐकणारा. त्यांच्यातले भावबंध दृष्ट लागावी असे असतात.

सुरुवातीच्या पत्र-संवादातून नचिकेत-समीरचे स्वभाव, त्यांची कौटुंबिक परिस्थिती कमीत कमी वेळात उभी केल्यानंतर चित्रपट गावातल्या कौलारू लग्नघरावर येऊन स्थिरावतो. पाहुणे-रावळे घरात रुळल्यानंतर काही काळाने घरातल्या व्यक्ती आणि नातेवाईकांमधले आपसांतले व्यवहार स्पष्टपणे दिसू लागण्यास सुरुवात होते. महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी’ची आठवण मनात चमकून गेल्याशिवाय राहत नाही. वरवर सुखी दिसणाऱ्या कुटुंबातले कंगोरे दृष्टीस पडू लागतात. वेगवेगळे हिशोब ध्यानी येऊ लागतात. आजोबा, आजी, मावश्या, मामा, शोभा, सीमा, नचिकेतचे वडील, आई, सगळ्यांची आपली एक कहाणी आहे. आपसांतले हिशेब आहेत. स्वभाव आहेत. या स्वभावाला असलेली कारुण्याची किनार आहे. या कहाण्यांच्या अनुषंगाने आणि संवादांच्या माध्यमाने, लेखक-दिग्दर्शक पात्रांमधले व्यवहार उभे करतात. वातावरणातल्या आनंदाखाली दडलेला ताण आता हळूहळू जाणवू लागतो. वातावरण अचानक बदलून जातं. गढूळ होतं.

नचिकेतचं घरात न रमणारं मन, नेमकं कशा प्रकारे विचार करतंय, वैशाखी रखरखाटात पांगाऱ्याच्या साथीनं माळरानं भटकणाऱ्या नचिकेतची मनःस्थिती अशी का आहे, याची किंचितशी जाणीव आता आपल्याला होऊ लागते. आजीचा खमकेपणा, आजोबांचा कर्मठपणा, मामाचं आजोबांशी फटकून वागणं, माडीवर बसून स्वतःच्या एकल-विश्वात अडकलेलं असणं, शून्यात बघत बुवांचं गाणं ऐकत असताना भान हरपणं, सीमाचा बुजरेपणा इत्यादी पात्र-स्वभावांशी आपला परिचय होतो. त्यांच्यातले परस्परसंबंध आणि संघर्ष ध्यानात येऊ लागतात. नचिकेत आणि समीरच्या संभाषणातून वातावरणातले रंग अधिकाधिक गडद, गहिरे होऊ लागतात. पूर्ण लांबीच्या साधारण मध्यावर असताना, चित्रपट एक जबरदस्त धक्का देतो. नचिकेत त्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला अचानकपणे निघून जातो. समीर आणि प्रेक्षकांना दिग्मूढ अवस्थेत ठेवून!

सुरुवातीच्या प्रसंगातली नचिकेतच्या तोंडून आलेली अदृष्याची व्याख्या, आपल्याला या टप्प्यावर जराशी समजू लागलेली असते. समीर आणि नचिकेत तारे पाहत असतानाच्या प्रसंगाचा अन्वयार्थ, आता काहीसा स्पष्ट होऊ लागतो. थेट ‘लायनकिंग’ चित्रपटातल्या प्रसंगाशी साधर्म्य साधणारा हा प्रसंग ‘विहीर’मध्ये खूप वेगळ्या संदर्भात येतो. झुलत्या झोक्यावर झुलत असतानाचा नचिकेतचा स्थिर विचारातून आलेला मोनोलॉग, मामाचं निरीक्षण करून नचिकेतनं स्वतःपुरते काढलेले निष्कर्ष, त्याच्या मनातल्या तत्त्वज्ञानाला अधिकाधिक पुष्टी मिळत जाणं, कानात गुप्त-गोष्ट सांगायच्या खेळातली नचिकेतनं सांगितलेली वरवर साधी वाटणारी, पण समीरची मानसिक स्थिती डळमळीत करणारी गोष्ट, सुरुवातीच्या काही संभाषणांतून समीरपर्यंत पोहोचणारा नचिकेतच्या मनातला कोलाहल, त्याच्यात आणि नचिकेतमध्ये येणारा दुरावा, त्या दुराव्यातून नचिकेतचं अधिकच एकटं, पण सजगपणे अलिप्त होत जाणं आणि मग अचानक अंगावर येणारी एक अनामिक शांतता, या सगळ्या प्रसंगांचा क्रम आणि अर्थ उलगडू लागतो.

संपूर्ण लांबीच्या साधारण मध्यावर, चित्रपटाचा परमोच्च बिंदू येऊन जातो. या जागी घडलेल्या घटनेमुळे, समीरच्या मनातला डोह तळापासून ढवळून निघतो. त्याचं संपूर्ण भावविश्व मुळापासून हादरतं. रोजच्या आयुष्याचं रहाटगाडगं सुरूच राहतं; पण त्याला सगळ्यातली अर्थहीनता अधिकच प्रकर्षाने जाणवू लागते. आयुष्याची क्षणभंगुरता अनुभवायला मिळते. अशाच विचित्र आणि विचारमग्न परिस्थितीत असताना, वर्गात जी. ए. कुलकर्णींच्या अश्वत्थामा आणि बुद्धाच्या कथेचा अर्थ सांगणाऱ्या गुरुजींचं बोलणं समीर कानात जीव एकवटून ऐकतो. ‘आकर्षक आणि सुंदर जीवन कुणामुळे होतं? तर मृत्यूमुळे!’, हे वाक्य ऐकून त्याला अचानक काहीतरी सापडल्यासारखं वाटतं. गणपती येतात. जातात. सणाचा उत्साह, मिरवणुकीचा जल्लोष... समीरला काही काही जाणवत नाही. पोहण्याचा सराव करत असतानाही कान पाण्याखाली गेल्यावर भेडसावणारी शांतता अंगावर येते. एरव्हीचा कोलाहल नको आणि पाण्याखालची शांतताही नको. 

समीर तिरीमिरीत निघतो. कुठेतरी जायला; पण नेमकं कुठे? त्याचं त्यालाही माहीत नसतं. खूप लांबवरचा प्रवास केल्यानंतर, एके ठिकाणी, भटकणाऱ्या मेंढरांना वाट दाखवणाऱ्या येशूसारखाच एक मेंढपाळ त्याला भेटतो. त्याच्याशी संवाद साधताना समीरचं मन जरासं निवतं. नच्या दादा नेमकं काय शोधत होता, ते आता समीरला उमगू लागतं. नव्यानेच झालेल्या गुरूकडून समीरला गुरूमंत्र मिळतो. ‘काजळाचे डोळे करून शोध. जे शोधतो आहेस, ते सापडेल!’ ‘आयुष्य म्हणजे नेमकं काय?’ या गहन प्रश्नाचं आपापलं उत्तर शोधावं प्रत्येकानं. तसं समीरही त्याच्या परीने शोधतो. मनोमन काहीतरी ठरवून, खूप दूरवर अचानक निघून गेलेल्या नच्या दादाच्या शोधार्थ, पुन्हा एकदा निघतो. एसटीमधून. त्याच दिवशीसारखा. दादाला आवडणारा फणस घेऊन. मळ्यातली विहीर वाटच पाहत असते. फणस काळ्या मातीवर ठेवून, काजळाचे डोळे करून, समीर हृदयापासून नच्यादादाला साद घालतो. त्यानं मारलेली हाक अपेक्षित परिणाम साधते. समीरला उत्तर गवसतं आणि पर्यायानं आपल्यालाही! 

उमेश कुलकर्णी यांचं अतिशय प्रभावी असं दिग्दर्शन, गिरीश कुलकर्णी, सती भावे यांची पटकथा, गिरीश कुलकर्णी यांनी लिहिलेले उत्कृष्ट संवाद, सर्वच कलाकारांचा दर्जेदार अभिनय, सुधीर पलसानेंचं देखणं छायाचित्रण, अँथनी रुबेन यांचं प्रभावी ध्वनी आरेखन, मंगेश धाकडे यांचं अर्थपूर्ण संगीतआणि नीरज वोरालीया यांचं नेटकं संकलन, अशा सर्व घटकांमुळे आणि अत्यंत अर्थपूर्ण अशा आशयामुळे, ‘विहीर’ हा आजवर प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांपैकी महत्त्वपूर्ण चित्रपट म्हणून गणला जातो. आयुष्य, त्यातलं प्रवाहीपण, त्यातलं एकलपण, त्याची अमर्याद खोली, त्याचा अमर्याद पैस, त्यात समाविष्ट असणारा, पण उघडपणे न जाणवणारा अस्वस्थ कोलाहल, त्यातली क्षणभंगुरता, अर्थहीनता, मूलभूत नियम, श्रद्धा, त्यांचं नेमकं अधिष्ठान, त्यांचं स्तोम, त्याला आव्हान देणारी काही जगावेगळी व्यक्तिमत्त्वं, त्यांना पडणारे विचित्र प्रश्न, त्यांची असमाधानकारक उत्तरं, या सगळ्यांची शास्त्र, अध्यात्म आणि तत्वज्ञानाशी बांधलेली मोट, हे सगळं नेमकेपणानं आणि नेटकेपणानं कैद करणारी ही चित्रकृती आहे.

सुरुवातीला असणारा लपाछपीचा प्रसंग, परीक्षेचा प्रसंग, स्वप्नदृश्यातला गोलाकार जिना, गोळ्यांचं वाटप, समीर आणि नचिकेतने एका प्रसंगात घातलेले लाल रंगाचे शर्ट, वाड्यात टांगलेला कंदील, विहीर, आभाळातल्या चांदण्या, दोलायमान आणि गतीशील अशा झोक्यावर नचिकेतचं स्थिर विचार करणं, लपाछपी खेळत असतानाचं स्वप्नदृष्य, पाऊस, जेवताना लागणारा ठसका, रुग्णवाहिका, देव्हाऱ्यातला उदास उजेड, पातेल्यात वाजणारं पावसाचं पाणी अशी असंख्य रूपकं आणि वाऱ्यासंदर्भातले संवाद, मामा-आजोबांच्यात असणाऱ्या नात्याचा अर्थ लावू पाहणाऱ्या नचिकेतने स्वतःच्या आणि वडिलांच्या नात्याची मनातल्या मनात तुलना करणं, मामाच्या गाणं आणि दारूच्या नशेआड लपण्यामागचा अर्थ, रेल्वेमध्ये भेटलेल्या पाकीटमारीचा प्रसंग इत्यादी अनेक अर्थपूर्ण प्रसंगांची मालिका असणारी, एकंदर आयुष्य जगण्यामागचं ज्याचं त्याचं कारण शोधू पाहणारी, ‘विहीर’ ही अफलातून सुंदर अशी अनुभूती आहे. जाणीव आणि नेणिवेतल्या संवेदनांचा संपृक्त अर्क आहे. हा अर्क सर्वांनाच पचणारा नक्कीच नाही; पण पचला, तर त्याहून सुंदर असं काहीही नाही. 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZQMBZ
 विहीर हा गंभीर सिनेमा आहे . त्याचा आशय तंतोतंत लिहिला आहे . धन्यवाद .2
 It's a fantastic feelings, when you start to feel .. To understand..To know..May from nature, human,or thought...!! Class2
 फारच सुंदर शब्दांकन....चित्रपट पुन्हा पाहिल्याचा feel आला....माझा आवडत्यांपैकी एक सिनेमा1
Similar Posts
तुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती रहस्यमय कथा असलेले चित्रपट हा प्रत्येकाच्याच आवडीचा विषय असतो. इतर चित्रपटांच्या तुलनेत रहस्यमय चित्रपट खिळवून ठेवणारे आणि उत्सुकता वाढवणारे असतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाड’ या रहस्यमय चित्रपटाच्या बाबतीतही हे खरं आहे. या चित्रपटाबद्दलच्या या लेखापासून हर्षद सहस्रबुद्धे यांचं ‘रसास्वाद’ हे
अस्तु : अंतर्मुख करणारी अनुभूती सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकरांच्या सिनेमात, विषयाची गंभीर हाताळणी कायमच पाहायला मिळते. समांतर सिनेमासारख्या प्रकारात तर ती फारच महत्त्वाची असते. समस्या, समस्याग्रस्त व्यक्ती (मध्यवर्ती पात्र), इतर सहायक पात्रं, समस्येचं गांभीर्य, त्यामुळे होणारे परिणाम, पात्रांच्या भावविश्वात आणि बाह्य विश्वात होणारी
तारकर : भय व गूढतत्त्वाची सशक्त अनुभूती आपल्या आजूबाजूच्या, आपल्या रोजच्या वावरण्यात असणाऱ्या जगातल्याच वास्तू, व्यक्ती किंवा साध्याश्याच वाटणाऱ्या घटना वेचून, कमीत कमी शब्दांत गूढ आणि भयाची निर्मिती करणं, ही रत्नाकर मतकरींची खासियत आहे. जोरदार पाऊस पडत असला, विजा कडाडत असल्या, वीज गेलेली असली, की मला त्यांची ‘तारकर’ ही भयकथा हमखास आठवते.
सेक्शन ३७५ : महत्त्वाच्या प्रश्नांचा तपशीलवार व तर्कसुसंगत वेध लैंगिक शोषण, स्त्री-पुरुष संबंध, बळजबरी, एकूण मनुष्यवृत्ती, कायदापालन महत्त्वाचं की न्याय होणं, इत्यादी अनेक महत्त्वाचे मुद्दे ‘सेक्शन ३७५’ या नव्या सिनेमात चर्चिले जातात. मानवी नातेसंबंधांना असणारी काळी किनार हा चित्रपट आपल्याला दाखवतो आणि विचारात पाडतो. या चित्रपटाचे हे रसग्रहण...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language